Sunday, 19 February 2017

एन. जी. ओ. कर्मचाऱ्यांना किमान वेतन Minimum Wages for NGO Workers

महाराष्ट्रातील धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंद असणाऱ्या सर्व सामाजिक आणि धार्मीक संस्थां अर्थात NGO मधील सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतनाचा कायदा लागू आहे...महाराष्ट्राच्या कामगार आयुक्त कार्यालयातून माहिती अधिकारात आजच याबाबत लेखी माहिती मिळाली आहे...!

महाराष्ट्रातील समाजकार्य पदवीधरांच्या (MSW-BSW) प्रश्नावर काम करण्यासाठी तयार झालेल्या समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळाच्या 26 नोव्हेबर 2016 रोजी पुण्यात झालेल्या बैठकीतील ठरावानुसार मंडळाचे अध्यक्ष अनिल गायकवाड पदाधिकारी संदीप आखाडे,वर्षा डांगे,हरिभाऊ सणस यांच्या सूचनेवरून केलेल्या माहिती अधिकाराच्या अर्जास उत्तर मिळाले आहे

आता याची अमलबजावणी होण्याच्या दृष्टीने मिळणाऱ्या किमान वेतनाचे सध्याचे निश्चित दर किती आहेत ते पाहावे लागतील आणि त्यानुसार किमान वेतन मिळत नसल्यास कारवाई करावी अशी मागणी करता येईल...माझ्या माहिती प्रमाणे सध्या महाराष्ट्रात 7200 रुपये किमान वेतन आहे आणि प्रत्येक 6 महिन्यांनी त्यात वाढ केली जाते...!

आपणांस विनंती आहे...कोणत्याही NGO मध्ये किमान वेतन मिळत नाही असे वाटत असल्यास आमच्याशी नक्की संपर्क करा...!

आता यापुढे जाऊन हा मिळणारा पगार पेमेंट ऑफ वेजेस कायद्यानुसार (500 पेक्षा जास्त कर्मचारी असतील तर 10 अन्यथा महिन्याच्या 7 तारखेच्या अगोदर आपल्या खात्यात जमा व्हावा यासाठी प्रयत्न करूयात कारण बहुतांश संस्था निधीचे कारण सांगून नियमित पगार देत नाहीत...!

शिवराम ठवरे-9175273528
सेक्रेटरी-समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ,महाराष्ट्र
shivramthavare25@gmail.com

NGO Workers एन. जी.ओ. कर्मचारी फसवणूक

समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ,महाराष्ट्र

प्रत्येक आठवड्यात एका तरी NGO ची तक्रार येत आहे...पगार नाही दिला...अपॉइंटमेंट लेटर नाही...कामावरून काही न सांगता काढले...12-12 तास कामावर राबवतात...स्वतःच्या कामगारांचे शोषण करू पाहणाऱ्या असल्या NGO समाजासाठी काय काम करणार..?

आजवर तक्रार कुणाकडे करायची असा प्रश्न होता पण आता समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ महाराष्ट्र नावाचा या आणि अशाच प्रकारच्या प्रश्नांवर काम कारण्यासाठी सक्षम राज्यव्यापी मंच उभा राहिला आहे...अनिल गायकवाड,वर्षा डांगे,संदीप आखाडे,विक्रांत मोरे,हरिभाऊ सणस,गजानन देशमुख,अमितकुमार अजनाळकर,सागर धुमाळ,शैला यादव आणि इतर अनेक सहकारी मित्र आपआपलं काम पहात मंडळाचे काम करत आहेत...!

आतापर्यंत अनेक NGO मधील आमच्याकडे आलेले प्रश्न कधी प्रेमाने...सामंजस्याने...कधी सध्या पत्रव्यवहारने...कधी सोशल मीडियाचा प्रभावी वापर तर कधी कधी शासनाकडे पत्रव्यवहार करून सोडवण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे..याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे...!

आपणासही स्वतःला असे प्रश्न असतील किंवा आपणांस असे प्रश्न असणारे सहकारी माहीत असतील...तर नक्की आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याशी संपर्क साधा...कोणताही मोबदला न घेता मार्गदर्शन करण्यात येईल...कोणतेही खोटे आश्वासन नाही आणि सदस्यत्व स्वीकारावं असं बंधन नाही...!

शिवराम ठवरे-9175273528
सेक्रेटरी-समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ,महाराष्ट्र.
shivramthavare25@gmail.com

सोस्वा अर्थात स्टापी कर्मचारी आंदोलन दुसरा दिवस 19-02-2017

सोस्वातील कर्मचाऱ्यांचे शोषण

SOSVA Training and Pramotion Institute http://stapi.org नावाच्या येरवडा पुणे येथील नामांकित NGO मधील कर्मचाऱ्यांचा आत्मकेश आंदोलनाचा आज दुसरा दिवस पूर्ण होत आहे...आजची रात्र देखील कर्मचारी ऑफिससमोर बसून राहणार आहेत...आज सुट्टी होती तरी कर्मचारी ठाण मांडून बसले होते तर संस्थाचालक आणि अधिकारी निवांत घरी मजेत असतील...!

आता उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे...सकाळी पुन्हा दडपशाही होण्याची शक्यता आहे...पाहुयात कर्मचारी एकजूट आहेत त्यांनी आता..सोस्वा कर्मचारी कृती समितीअशा नावाने इंफॉर्मल गटदेखील बनवला आहे...!

MSW आणि BSW पदवीचे सोशल वर्क मधील शिकेलेलं जीवनात अमलात आणत आहेत हाच आनंद आहे... संकटापासून पळून जाण्यापेक्षा त्याच्याशी दोन करणार असा निर्धार त्यांनी केला आहे..खरच कौतुकास्पद..!

शिवराम ठवरे-9175273528
मुक्त पत्रकार-19-02-2016
सेक्रेटरी-समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ,महाराष्ट्र
shivramthavare25@gmail.com

सोस्वा अर्थात स्टापी संस्था कर्मचारी आंदोलन पहिला दिवस 18-02-2017

SOSVA Training and Pramotion Institute http://stapi.org नावाच्या येरवडा पुणे येथील नामांकित NGO मधील कर्मचाऱ्यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली...पुण्यात सगळीकडं प्रचाराची धामधूम असताना उच्चशिक्षित असणारे हे तरुण आपल्या न्याय्य मागण्यासाठी संस्थेच्या व्यवस्थापकांनी चर्चा करून तोडगा काढवा यासाठी आत्मक्लेश म्हणून संस्थेच्या दारात धरणं धरून बसले आहेत...!

काय आहेत मागण्या..?

कर्मचार्यांनी दिलेल्या पत्राचे अवलोकन केले असता त्यांचा खालील फक्त तीनच प्रमुख मागण्या आहेत असं समजतं...!

1.बेकायदेशीर निलंबित केलेल्या 4 सहकारी मित्राचं निलंबन मागे घ्यावे.
2.ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त काम करून घेतले त्याचा अधिकचा मोबदला अर्थात ओव्हरटाईम मिळावा.
3.पुणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जलस्वराज्य प्रकल्प 2 वर काम करणाऱ्या संस्थेतील कर्मचाऱ्यांना शासनाने ठरवलेल्या नियमानुसार वेतन दिले जावे सध्या 2 ते 3 हजार कमी दिले जात आहेत त्यासोबत ठरलेला प्रवास भत्ता आणि मोबाईल भत्ता दिला जात नाही तो नियमित मिळावा.

याचबरोबर बाकी इतरही प्रश्न आहेत यामध्ये..वेळच्या वेळी पगार मिळावा,ऑफिस टाईम ठरवावा,नियमानुसार पगारी सुट्या मिळाव्यात,सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांना अनुभव प्रमाणपत्रं दिली जावीत इत्यादी यासाठी संस्थेच्या अधिकारी आणि व्यवस्थापनांनी चर्चा करून प्रश्न सोडवावा यासाठी विनंती अर्ज दिलेला होता ऑफिस संपण्याची वेळ संध्याकाळी 5.30 पर्यंत कोणताही प्रतिसाद न दिल्यास आत्मक्लेश म्हणून संस्थेच्या दारात बसून राहायचा आणि आपली मागणी मान्य न होईपर्यंत घरीच न जाण्याचा निर्णय त्यांनी पत्रात सांगितला होता...!

व्यवस्थापणाचे पूर्णतः असहकार्य

संस्थेला याबाबत कर्मचाऱ्यांनी पूर्वसूचना दिलेली असताना देखील आजच्या संपूर्ण दिवसात चर्चा झाली नाही...संस्थने कोंडून ठेवलेल्या कर्मचारी वर्गास बाहेर काढण्यासाठी पोलिसांना बोलावून पोलीस चौकीत जावं लागलं आणि त्यानंतर चर्चा न करताच विश्वस्त आणि व्यवस्थापणाने पळ काढला...!

त्यांनी चर्चा करावी म्हणून मी संस्थेच्या CEO कानिटकर मॅडम यांना स्वतः फोनही लावला पण उलट मी धमकी दिल्याचे खोटंच सांगत पोलीस स्टेशनला मॅडमनी धाव लगेच  घेतली...परंतु पोलिसांना मी त्यांना केलेला आपला फोन रेकॉर्डिंग केला आहे आणि तो सोशल मीडियावर टाकलेला आहे असं सांगताच तिचा मॅडमचा चेहरा रडवेला झाला...संस्थेच्या मते 30 वर्षात अशी कधी तक्रार नाही त्यांचा एक विश्वस्त सांगत होत्या...आम्ही सर्व नियम पाळतो...उत्तम सामजिक काम करतो...संस्थचे विश्वस्त निवृत्त सरकारी अधिकारी आहेत...वकील आहेत आम्ही काय ते पाहून घेऊ आम्ही सरकारी माणसांना कसेही मॅनेज करू...!

मी स्वतः तसंच कर्मचारी आणि पोलिसांनी देखील चर्चा करून हा प्रश्न सोडावा अशी व्यवस्थापणास विनंती केली परंतु त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही...संस्थेकडे लेखी मागण्यांचे निवेदन दिलेले आहेच त्याचबरोबर पुण्याच्या कामगार आयुक्त कार्यालय...जिल्हा परिषद पुणे आणि याठिकाणी देखील याच्या प्रती दिलेल्या आहेत...पोलिसांनी आणि धर्मादाय आयुक्तांनी आमच्या अखत्यारीत कामगार विषय येत नाही त्यामुळे निवेदन स्वीकारले नाही...!

सहकारी मित्रांचे नेहमीप्रमाणे मार्गदर्शन

संपूर्ण दिवसभरात या प्रश्नाच्या बाबतीत आमचे मार्गदर्शक विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे उपाध्यक्ष कॉ.विजय मांडके,पुण्यातील हमाल पंचायतीचे साथी नितीन पवार,पत्रकार मित्र हर्षल लोहकरे,समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळाचे उपाध्यक्ष संदीप आखाडे,सहसचिव हरिभाऊ सणसयांच्याशी चर्चा करून मार्गदर्शन घेतले..तर आमचा सहकारी सागर धुमाळ स्वतः उपस्थित होता..!

पोलिसांचे सहकार्य

पुण्याच्या निवडणुकीच्या कामात व्यस्त असूनही येरवडा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक श्री.अशोक कदम आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे मा. लोहार साहेब यांनी प्रश्न समजून घेतला आणि लोकशाही मार्गाने चाललेल्या तुमच्या आंदोलनास आम्ही अडवू शकत नाही असं संस्थेच्या पदाधीकाऱ्यासमोरच सांगितले त्यामुळं खूप बरं वाटलं...!

चर्चेसाठी दिलेली मुदत संपली आणि आता...

आज दिवसभरात कोणतीही सकारात्मक चर्चा न झाल्यामुळं अजूनही सर्व कर्मचारी दारासमोर बसलेले आहेत...माहित नाही चर्चा कधी होईल पण कर्मचारी आपल्या मतावर ठाम आहेत याचा आनंद आहे...आता 5 महिला कर्मचाऱ्यासह 13 जण संस्थेच्या दारातच रात्र काढणार असल्याचं कळवलं आहे..संस्थेच्या निगरगट्ट प्रशासनाचा निषेध...लोकशाही मार्गाने सुरु झालेल्या आंदोलनास सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी प्रसिद्धी दिलीत त्यामुळं याची सगळ्या सामजिक संस्थच्या वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार...!

संस्था आणि कर्मचारी यांच्यात लवकरात लवकर चर्चा होऊन सकारात्मक मार्ग लवकरात लवकर निघेल अशी आशा करूयात...यांच्यासारख्या इतरही कामगार हितविरोधी संस्थांना जाग येवो हीच इच्छा आहे...लडेंगे जितेंगे...!

शिवराम ठवरे-9175273528
मुक्त पत्रकार-18-02-2017
सेक्रेटरी- समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ,महाराष्ट्र

सोस्वा अर्थात स्टापी पुणे संस्था कर्मचारी मिटिंग 17-02-2017

अत्यंत महत्वाचे निवेदन...समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ महाराष्ट्र

आता उशिरा SOSVA Training and Pramotion Institute http://stapi.org नावाच्या पुण्यातील नामांकित NGO मधील काही कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेतली...येथील प्रश्न खूप गंभीर आणि गुंतागुंतीचा आहे पण येथे काम करणाऱ्या बहुतांश सर्वांनी आता सामुदायिकपणे आपल्या स्वतःच्या प्रश्नांवर संस्थेच्या विरोधात उभं राहण्याची जिद्द ठेवली आहे...!

संस्थेमध्ये मागील काही महिन्यापासून होणाऱ्या शोषणाबाबत हे सगळे कर्मचारी संस्थेचे वरीष्ठ अधिकारी आणि विश्वस्त यांचेकडे पाठपुरावा करत आहेत...त्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी सकारात्मक भावनेने विनंत्या करत आहेत परंतु त्याकडे वरीष्ठ अधिकारी व विश्वस्त दुर्लक्ष तर करत आहेतच परंतु होणाऱ्या अन्यायाला सामूहिक प्रतिकार करत असल्याचं लक्षात आल्यामुळे आता दडपशाही म्हणून संस्थेतील 4 सहकारी मित्रांना कोणतीही पूर्वकल्पना न देता कामावरून कमी केलेले आहे...!

कामावरून काढून टाकण्याचं कारण फक्त एवढेच कि त्यांनी अन्याय सहन कारण्यास नकार दिला आणि  त्याविरोधात बोलायला सुरुवात केली..याचा निषेध म्हणून संस्थेतील सर्व कर्मचारी उदया दिनांक 18 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 10 वाजलेपासून संस्थेच्या आवारात संविधानिक मार्गाने याचा सामूहिक प्रतिकार करणार असल्याचं सांगितलं आहे...आणि आपल्याकडे त्यांनी मदत मागितली आहे...त्यांनी सांगितले प्रमाणे त्यांचे काही प्रश्न खालील प्रमाणे आहेत..!

नियमीत वेळेवर पगार केले जात नाहीत..!

कोणताही जादाचा मोबदला न देता सुमारे 14 ते 18 तास काम करवून घेतले जाते..त्यांचा कामाचे तास निश्चित नाहीत..!

आठवडी सुट्टी आणि राष्ट्रीय सण व उत्सवाच्या दिवाशीदेखील सुट्टी दिली जात नाही अगदी 26 जानेवारीलाही कामावर बोलवले जाते...!

पगारी रजा दिल्या जात नाहीत..!

कर्मचारी वर्गासोबत वरिष्ठ उद्धट बोलतात...गुलामाप्रमाणे वागणूक देतात..!

जलस्वराज्य सारख्या शासकीय प्रोजेकटवरती ठरवून दिलेल्या वेतनापेक्षा कमी वेतन दिले जाते...!

कोणतीही पूर्वसूचना न देता कोणत्याही कर्मचाऱ्यास कामावरून कधीही काढून टाकण्यात येते...!

संस्था सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांना अनुभव प्रमाणपत्र दिले जात नाही..त्यासाठी काही वेळा पैशांची मागणीदेखील केली जाते...!

तुम्हा सर्व सहकारी मित्रांना कळकळीची विनंती आहे...आपल्या सहकारी मित्रांनी सुरु केलेल्या या लढाईला आपण नैतिक सामजिक पाठींबा मिळावा यासाठी सहकार्य करूयात...त्यांची लढाई आपलीच आहे असं समजून काही मदत लागल्यास आम्ही सोबत आहोत याची खात्री देऊयात...याकरिता कृपया सर्वांनी या पोस्टला जास्तीत जास्त सोशलमीडियावरून प्रसिद्धी दयावी हीच विनंती...!

SOSVA Training and Pramotion Institute मधील सर्व कर्मचारी सहकारी मित्रांचे विशेष अभिनंदन आणि समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळाचा यास सक्रिय पाठिंबा राहील ...त्यांनी अजूनही कोणती मदत मागितली तर नक्की सोबत उभे राहुयात...शक्य ते सर्व प्रयत्न करूयात...उदया संस्थेचे वरिष्ठ आणि व्यवस्थापक या कर्मचारी वर्गास सकारात्मक प्रतिसाद देतील आणि संघर्ष टाळून प्रश्न सोडवतील अशी आशा करूयात...!

लडेंगे जितेंगे...!

शिवराम ठवरे-9175273528
मुक्त पत्रकार-17-01-2017
सेक्रेटरी- समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ,महाराष्ट्र.
shivramthavare25@gmail.com

Saturday, 11 February 2017

पॉर्न,कामजीवन आणि ग्रामीण महाराष्ट्र By प्रियदर्शनी हिंगे

पॉर्न,कामजीवन आणि ग्रामीण महाराष्ट्र By प्रियदर्शनी हिंगे

हा लेख माझा नाही लेखकाने स्वतः खूप विचारपूर्वक वास्तव सांगितले आहे म्हणून शेअर केला आहे

एका कार्यक्रमादरम्यान महिला पोलीस कक्षात काम करणाऱ्या महिलेशी, तसंच महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या महिला वकिलांशी बोलणं झालं. त्या दरम्यान महिलांवर होणाऱ्या अनेक प्रकारच्या अत्याचारांची धक्कादायक माहिती मिळाली. त्या सांगत होत्या “दहापैकी नऊ केसेसमध्ये नवरा-बायकोच्या शारिरीक संबंधांमध्ये मारहाण झालेली असते. आणि ही मारहाण केवळ इंटरनेटवर फिरणारे पोर्न व्हिडिओ पाहण्यासाठी केली जाते.” ..!

जिथे पिण्याचे पाणी आणण्यासाठी सात किलोमीटर चालावे लागते, अशा एका खेड्यात नवऱ्याने पशुसारखा सेक्स केल्याने, त्या बाईला दवाखान्यात दाखल करावे लागले. या सगळ्या प्रकाराने तिला किती शारीरिक यातना झाल्या असतील, हे तिला घातलेल्या टाक्यांवरून समजते. दुर्गम भागात पोर्न व्हिडिओ पोहोचू शकत नाहीत, असा आपला भ्रम खोटा ठरवणाऱ्या आणखी काही अशाच प्रकारच्या घटना याच गावात उघडकीस आल्या. केवळ नवरा असं काही करतो, हे सांगायचं कसं आणि कुणाला, या संकोचामुळे या घटना समोर आल्या नाहीत. अशा अनेक घटना आजही अतिशय मागास समजल्या जाणाऱ्या भागातही घडताहेत....!

नांदेडमधल्या एका छोट्या खेड्यात एका अशिक्षित महिलेसोबत पतीने अनैसर्गिक सेक्स केल्यामुळे तिला अनेक महिने हॉस्पिटलमध्येच उपचारांसाठी राहावं लागलं. तिच्याकडे चौकशी केल्यावर समजले की पोर्न व्हिडीओत पाहूनच तिचा पती तिच्याशी अनैसर्गिक सेक्स करीत असे.त्यात दाखवतात म्हणजे त्यांना जमतं तर, आपल्यालाही जमेल, असा त्याचा समज. पत्नीनं अनेकदा शारिरीक त्रासाची तक्रार वारंवार करुनही केवळ आनंदप्राप्तीच्या हव्यासापायी त्यानं आपल्याच पत्नीला शारिरीक त्रासाच्या खाईत लोटलं...!

हे पोर्न व्हिडिओ पाहून आपणही अशा प्रकारे आनंद प्राप्ती करायला काय हरकत आहे, हा विचार डोकावतो; मात्र यासर्वांचे मूळ कशात आहे, हेच मुळी माहित नसल्याने अनेक प्रश्न अक्राळविक्राळ स्वरुप घेऊन समोर येतात....!

इंटरनेट माहितीचा खजिना असला, तरी या खजिन्यातून काय घ्यायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. असं जरी असलं तरी इंटरनेट सर्वाधिक वापरलं जातं ते पोर्न व्हिडीओ पाहण्यासाठी पोर्न व्हिडीओ पाहण्याचा सर्वात स्वस्त आणि सोपा मार्ग आहे इंटरनेटचा. आधी हे लोण केवळ शहरापुरतं आहे, असा समज होता, मात्र हा समज प्रत्यक्षात गैरसमज ठरतो आहे. हे पोर्न व्हिडीओचं लोण गावागावात पसरतं आहे. केवळ पसरतच नाहीये तर त्याबरोबर अनेक गैरसमजुती आणि गुन्ह्यांना खतपाणी घालत आहे.नको त्या वयात चुकीची माहिती अशा प्रकारे मिळाल्यानं अनेक जण गुन्ह्यांचे बळी ठरत आहेत...!

©प्रियदर्शनी हिंगे.

Thursday, 1 December 2016

जेष्ठ समाजिक कार्यकर्त्या डॉ.सुलभाताई ब्रह्मे यांचे निधन...!

महाराष्ट्रातील जेष्ठ स्त्रीवादी,निसर्गवादी मुक्त विचाराच्या क्रियाशील कार्यकर्त्या संशोधक आणि लेखिका सुधाताई ब्रह्मे यांचे आज सकाळी निधन झाले.. लोकविज्ञान संघटना,शंकर ब्रह्मे समाजविज्ञान ग्रंथालय आणि लोकायत याद्वारे त्यांनी सामाजिक कार्य आणि लिखाण केले आहे...!

जागतिकरण, मुक्त व्यापार धोरण,सेझ प्रकल्प,जैतापूर अणुऊर्जा यांच्या विरोधातील लोकचळवळीत त्यांचा पर्यावरण संवर्धन आणि मानवी जीवनाच्या शाश्वत विकासाची संकल्पना घेऊन सक्रिय सहभाग होता....!

अलीकडच्या काळात भाजपा सरकारने केलेल्या गोवंश हत्याबंदीचा निषेध करून गोवंश हत्याबंदीचा आर्थिक आणि सामाजिक दुष्परिणाम विषद करणारी त्यांची पुस्तिका संपूर्ण देशभरात चर्चेची ठरली होती...!

आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी भांडवली आणि ब्राह्माणी मानवताविरोधी मूल्यांची चिकीत्सा करून डाव्या पर्यायी विकासनीतीच्या अजेंड्यावर काम केले...तसे काम करणाऱ्या व्यक्ती संस्था संघटना आणि चळवळींना मनापासून मदत केली...!

आमचे मार्गदर्शक कॉ.धनाजी गुरव यांनी माझी आणि मयुरची विद्रोहीचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्यासोबत त्यांचाच घरच्या भेटीत ओळख करून दिली होती... त्यांचा घरातील पुस्तके,त्यांचे लिखाण पाहून मयुर आणि मी दोघे हरकून गेलो होतो...पहिल्याच भेटीत त्यांनी त्यांच्या सर्व पुस्तकांचा संच आम्हा दोघांना भेट दिला होता...!

फोनवर अनेकवेळा बोललो तुम्ही माझी पुस्तके वाचलीत तर त्याचा अभिप्राय लिहून दया असं प्रत्येकवेळी त्या बोलत....त्यानंतर फक्त दोनवेळा त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली होती...एकदा सुनंदासोबत असताना दोघानाही प्रश्नांची सरबत्ती केली होती.. एकदम आठवणी जाग्या झाल्या...!

त्यांच्या निधनामुळे परिवर्तनवादी चळवळीची मोठी हानी झाली असून त्यांचे डाव्या पर्यायी सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक विकासनीतीचे काम पुढे घेऊन जाणे हीच श्रद्धांजली असेल...विद्रोही सलाम...!

शिवराम ठवरे-01-12-2016
मुक्त पत्रकार-9175273528
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र
shivramthavare25@gmail.com