Saturday 20 August 2016

20 ऑगस्ट 2016 निषेध धरणं आंदोलन पुणे

हिंसामुक्त समाजासाठी मानवतेचा जागर...पुण्यात महात्मा फुले मंडईत पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांची जोरदार निदर्शने...!

आज डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला 3 वर्षे झाली... सगळ्या देशभर मागास सर्वच प्रगतशील विचारांच्या व्यक्ती,संस्था,संघटना,राजकीय पक्ष आपापल्या गावात...शहरात जमेल त्या पद्धतीने निषेध सभा धरणे आंदोलनं मोर्चे निवेदने देत आहेत..दुःखद दिवस असूनही सगळीकडं उत्साहाचं वातावरण आहे...तरुणाई यामध्ये विशेष उत्साहानं सहभागी आहे हे खूप आशादायक आहे...!

मुक्तिवादी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी आपण 20 ऑगस्टला पुण्यात काही निषेधाचा कार्यक्रम करता येईल असा प्रस्ताव ठेवत पुणे विद्यापीठात काही दिवसांपूर्वी बैठक बोलावली होती...या बैठकीत मोर्चा किंवा धरणे आंदोलन करूयात असे निश्चित झालं...पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नेतृत्वात कार्यक्रम असणार हे लक्षात घेऊन आपल्याला नियोजन करावे लागेल असा विचार माझ्यासह बहुतेकांनी मांडला होता..!

त्यामुळं पुढच्या बैठकीत सकाळच्या मोर्चात सहभागी होऊन राष्ट्र सेवा दलात होणाऱ्या कार्यक्रमात दिवसभर उपस्थित राहून संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत पुण्यातील मुख्य आणि गर्दीचे ठिकाण असणाऱ्या महात्मा फुले मंडई समोर निषेध धरणे आंदोलन करूयात असे ठरले...!

अगोदर निश्चित झल्याप्रमाणे मुक्तिवादी संघटना,विद्रोही सांस्कृतिक चळवळ,स्टूडंट फेडरेशन ऑफ इंडिया,सत्यशोधक विद्यार्थी संघटना,युवक क्रांती दल,युवा भारत,विद्रोही विद्यार्थी संघटना,नव समाजवादी पर्याय,दलित आदिवासी अधिकार आंदोलन,आइसा या संघटना आणि पुणे विद्यापीठातील या संघटनांचे कार्यकर्ते यांच्या सहभागाने कार्यक्रमाची तयारी सुरु झाली...!

प्रत्येकानं नेमून दिलेली जबाबदारी पार पाडत मिशन-20 ऑगस्ट पार पडायचं असे ठरवलं...सर्व संघटनांनी घोषणा तयार करणं, पत्रकाचा मजकूर तयार करणं,बॅनर बनवणं,पोलीस परवानगी काढणं वृत्त पत्रात प्रसिद्धी देणं,सोशल मीडियावर माहिती देणं या आणि अशा सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारत आजचा कार्यक्रम यशस्वी केला..!

संध्याकाळी 5 वाजलेपासून 6.30 पर्यंत गाणी घोषणा आणि कार्यकर्त्यांची भाषणं याने सगळा मंडई चौक दणाणून सोडला... कोणत्याही नियंत्रणाशिवाय उस्फुर्तपणे सर्व संघटनांचे मिळून पुण्यातील 83 तरुण-तरुणी यात सहभागी झाले होते...शांत रानडे ,विठ्ठल वाघ यांचेसारखे 20-25 जेष्ठही वृत्तपत्रातील बातम्या वाचून स्वतः सहभागी झाले होते...निषेधाची 1000 पत्रकं आपल्या कार्यकर्त्यांनी उपस्थित असणाऱ्या आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना वाटली... लोकांनी थांबून त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला..काही लोकं तासभर थांबून होती हे विशेष...!

पोलीस प्रशासनाने 1 तासाची परवानगी दिली होती... कार्यक्रमाची संवेदनशीलता लक्षात घेऊन विश्रामबागवाडा आणि फरासखाना पोलीस स्टेशनच्या 10 पोलिसांची तुकडी कार्यक्रमस्थळी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह उपस्थित होती...वाहतुकीचे नियोजन करत निषेध धरणे आंदोलनाला उत्तम सहकार्य केले..त्यांचा सहकाऱ्यामुळं कार्यक्रम प्रभावी होऊ शकला हे मान्यच करावे लागेल...!

प्रत्येक संघटनेतील एका कार्यकर्त्याने निषेधाचे भाषण केले...शाहीर धम्मरक्षित रणदिवे,आकाश, राहुल,मुक्ती साधनाच्या उपस्थितीने जोरदार गीते सादर करता आली.. केवळ आपल्या नेत्यांचा खुनाचा निषेध करून चालणार नाही तर त्यांचा वारसा पुढं नेऊन विवेकाचा आणि परिवर्तनाचा वारसा कायम जोरकसपणे पुढे नेण्याची प्रतिज्ञा घेतली...!

विद्रोही विद्यार्थी संघटना आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ यांच्या वतीने प्रकाश रणसिंगने निषेधाचे भाषण केले...विद्रोहींचे पुण्यातील 8 कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी होते..या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित आलेल्या सर्वाना सोबत घेऊन पुण्यात यापुढे जोरकसपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे...!

लडेंगे जितेंगे...!

शिवराम ठवरे-20-08-2016
मुक्त पत्रकार-9175273528
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र
shivramthavare25@gmail.com

No comments:

Post a Comment