Tuesday 16 August 2016

देश स्वतंत्र आहे आपण स्वातंत्र अनुभवतोय का...!

देश स्वतंत्र आहे आपण स्वातंत्र अनुभवतोय का...!

भारताला स्वातंत्र मिळवल्यामुळं संविधान मिळालं...संविधानामुळं शिक्षण मिळवता आलं... शिकत असताना वास्तव विचार करणारी माणसं मिळाली...त्यांनी लिहलेली पुस्तकं मिळाली...त्यांचाकडून ज्ञान मिळालं... ज्ञानामुळं शोषण कळालं...शोषीत कोण ते समजू लागलं...!

स्वातंत्र अनमोल आहेच...पण 15 ऑगस्टला आपला स्वतंत्र दिवस साजरा करताना 14 ऑगस्टला स्वतंत्र दिवस साजरा करणाऱ्या पाकिस्तानला शिव्या घालणं म्हणजे देशप्रेम नव्हे...!

16 ऑगस्ट 1947 ला भर पावसात हजारो लोकांना संघटित करून "यह आझादी झूटी है देश कि जनता भुकी है" या विश्वव्यापी घोषणेचा अर्थ समजावून घेणं आणि  समाजात असणारे प्रश्न सुटावेत यासाठी थोडंफार काही करता आलं तर तो देशप्रेम म्हणता येईल...!

आता तर कुठे 70 वर्षे झाली आहेत... आपली वाटणारी माणसं बोलू लागली आहेत...शिकू लागली आहेत संघटित होऊ लागली आहेत...संघर्ष करू लागली आहेत...क्रांतीची गाणी गाऊ लागली आहेत...त्यांच्यासोबत राहूयात...क्रांतीची गाणी गाऊयात.

हजारो वर्षे सांस्कृतिक, राजकीय,सामजिक अंधारात दडवून ठेवलेल्या आपल्या माणसांना उजेडाच्या वातावरणाशी समरूप व्हायला वेळ लागणारच....स्वातंत्र मिळवण्यासाठी पुढच्या रांगेत शस्रासह आणि शस्त्राशिवाय प्रत्यक्ष लढणाऱ्या ज्ञात अज्ञात साऱ्या शिलेदारांना नेहमीच केवळ सलामच करत बसायचं कि आपणही आता स्वतंत्र देशात आपल्या न्यायासाठी संविधानिक मार्गाने लढाई करायची याचाही विचार करावा लागेल...!

अगदी माझ्या आई-वडीलनाही राष्ट्रगीत म्हणता येत नाही...ते कधी भारत माता की जय असे म्हटले असतील असही वाटत नाही.. देशात अशी अनेक माणसं आहेत ज्यांना देश म्हणजे काय सांगता येणार नाही अनेकांना अजूनही घरच नाहीत स्वतःचा पत्ता नाही..कोणतंही ओळखीच कागदपत्रं जवळ नाही रोज काम करून खाण्यापूरतं कमवायचं असा दिनक्रम असणारी लोकसंख्या जास्त आहे...!

देशात केवळ चांगले रस्ते,रेल्वे मोठ्या कंपन्या आल्या म्हणजे विकास म्हणता येईल का... सगळीकडं आलंबेल आहे असे भासवले जात आहे पण आज देशात वातावरण गंभीर आहे...माणसाचं मुक्त विचार करण्याचं स्वातंत्र धोक्यात आहे...संविधान धोक्यात आहे...त्यामुळं देश स्वतंत्र आहे आपण स्वातंत्र अनुभवतोय का असा प्रश्न स्वतःला विचारावा लागेल आणि त्याचा समाधानासाठी काहीतरी योगदान करावेच लागेल...!

शिवराम ठवरे 14-08-2016
मुक्त पत्रकार -9175273538
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र
Shivramthavare25@gmail.com

No comments:

Post a Comment