Friday 8 July 2016

काटकर सरांचा वाढदिवस

आज काटकर सरांचा वाढदिवस असल्याचे समजले आणि सहज भूतकाळ आठवला खरंच सर जर माझ्या आयुष्यात आले नसते तर मी असा असतो का..?
नक्कीच नाही...!
प्रा.गौतम काटकर माझ्यात बदल घडवणारा विलक्षण अवलिया...अतिशय गरीबीतून मोठा होत असलेला मी पाहिलेला अनुभवलेला जिवंत माणूस...!
पाय जमिनीवर घट्ट रोवून उभं राहत आनंदात जगात येतं याचं अनोखं उदाहरण...चळवळीत येणाऱ्या नवख्या कार्यकर्त्याला काय अडचणी येतात येऊ शकतात याचा स्वतःच्या अनुभवावरून अंदाज असल्यामुळे नेहमीच पदरमोड करणारा....!
महिन्याच्या पगारातील 10-5 हजाराचा हिशोब नेहमीच चुकणार...केवळ आर्थींक अडचणींमुळे कुणाची ओढाताण होऊ नये हा प्रामाणिक विचार करणारा विद्यार्थीप्रिय प्राध्यापक...!
सातत्याने पुस्तके आणि माणसे यांच्या घोळक्यात असणारा मितभाषी...कितीही काम करत असला तरी बडेजाव करणार नाही...स्वतःची प्रसिद्धी नाही झाली तरी चालेल पण आपल्यासोबत असणाऱ्या माणसाची भलीमोठी ओळख करून देतील...!
सामाजिक कामात रंगून गेल्यामुळे स्वतःची पी. एच. डी देखील 2 वर्षे लांबली...मिरजेत घर साताऱ्यात नोकरी...त्यामुळे दर सुट्टीला होणारी ओढाताण...धावाधाव...घराकडे दुर्लक्ष...परत स्वतःची समजूत...!
काय बोलावे आणि काय नाही...एकाच वेळी तो मार्गदर्शक असतो...मित्र असतो...पालक असतो...मोठा भाऊ असतो...कोणतीही चुकीची गोष्ट घरी समजली तरी चालेल पण सरांना समजायला नको असे वाटते एक आदरयुक्त भीती तरीही....काटकर सर म्हणजे खरंच ग्रेट माणूस...!
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा..!

सुनंदाचा 26 वा वाढदिवस

आज सुनंदाचा 26 वा वाढदिवस आणि माझ्या सोबत असल्यापासूनचा 6 वा वाढदिवस...या सहा वर्षाच्या काळात तिच्या सोबतीने माझा चाललेला जीवनप्रवास खूप सुखकारक आहे हे नक्की...!
सहा वर्षात माझे शिक्षण होईपर्यंत केलेली मदत,नोकरी मिळेपर्यंत माझा केलेला सांभाळ,आमच्या लग्नाचा खर्च,आमच्या घराचे बांधकाम या सगळ्या जबाबदाऱ्या तिनेच पार पाडल्या... मी केवळ "निमित्तमात्र" त्यात थोडा माझा विचित्र आणि तापट स्वभाव, "चळवळीत कार्यकर्ता" म्हणून काम करण्याची "हौस" अनेक वेळा तीला अनपेक्षितपणे पोलीस स्टेशनच्याचकरा सुद्धा घालायला लावतात...!
लग्नानंतर सुरवातीच्या काळात मला खूप कमी पगार होता त्यावेळी तिला माझ्यापेक्षा तिप्पट पगार मिळत होता...मी कधी कधी नाराज व्हायचो पण ती लगेच म्हणायची बायकोला जास्त पगार मिळतो म्हणून नाराज हॊणार "कसला रे तू पुरोगामी" कार्यकर्ता...मला लाजल्या सारखं व्हायचं...!
तिच्या खरे तर अपेक्षा खूप असतात...पुण्यात घर घ्यायचे आहे...फोर व्हीलर चालवायची आहे...तिला मॅनेजर व्हायचे आहे...आणि यासाठी खूप प्रयत्न करत असते...स्वतःची सव्वा वर्षाची मुलगी गावाला ठेऊन पुण्यात राहताना "तिच्यामधील आईला" काय वाटत असेल कल्पना करवत नाही...!
त्यात माझ्या सगळया सुट्या हा कार्यक्रम ती मीटिंग इकडे पळा तिकडे पळा अशाच जातात...सुटीच्या दिवशी मी सोबत असावं असं वाटतं...कधी असतो कधी नाही...एखादा सोबत पिक्चर पहिला तरी तिला समाधान वाटतं... कधीतरी बागेत गेलो...एखादे आईस्क्रीम खाल्ले तरी आनंद होतो...माझ्या हाताचे "कालवण" तिला खूप आवडते..आठवड्यातून एकदा तरी करायला लावणारच...!
बायकांना तसेही आयुष्यात खूप मॅनेज करायला लागते...तीदेखील एकाच वेळी,नोकरी तिथली माणसं,मला आणि माझ्या घरातील माणसं,तिच्या घरातली माणसं मॅनेज करत आताही माझ्यासोबत खंबीर उभी आहे..!
रोज काही बाही पोस्ट करतोच पण रोज सोबत असणाऱ्या सुनंदाबाबत मात्र सहा वर्षातून एकदा लिहितोय खरंच मी तिच्यासाठी कंजुषच आहे नाही का...?

भाजपेयी ते विद्रोही...!

भाजपेयी ते विद्रोही...!
सात वर्षांपूर्वी पुण्यात झालेल्या पश्चिम महाराष्ट्र भाजपा कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहण्याकरताचा ह नोंदणी पास जुनी कागदपत्रं तपासताना आज मिळला...!
मागचा काळ सहज डोळ्यासमोर आला...सातारा जिल्ह्यात भाजपा औषधालाही नसताना आम्ही मोजकेच लोक मनापासून काम करत होतो....माझा जिवलग मित्र प्रशांत पवार त्यावेळी भारतीय जनता पार्टी विद्यार्थी मोर्चाचा सातारा तालुका अध्यक्ष होता..!
आज सहकार मंत्री असणारे चंद्रकांत पाटील पदवीधर मधून आमदार व्हावेत यासाठी आम्ही दोघांनी जवळ जवळ महिनाभर कॉलेज सोडून राजवाडा बसस्थानकाजवळील प्रचार कार्यालयात ठान मांडले होते...!
स्वतः त्यावेळी पदवीधर नव्हतो मतदार नव्हतो तरी पदवीधरच्या मतदार यादया तोंडपाठ केल्या होत्या...मतदानाला कोण येईल नाही येईल...गाड्या कुठून करायचा....मतदार केंद्रावर काय करायचे असली सारी रणनिती करत बसायचो...!
दादा कधीमधी यायचे...विजय काटवटे पक्का माणूस..आज तो युवा मोर्चाचा जिल्हा सरचिटणीस आहे...दादांचा सातारा जिल्हा पी. ए. आहे...साताऱ्याच्या पार्टीच्या ब्युरोक्रॅटिक हेडच मनाने उत्तम आहे...आजही वैचारिक विरोधक असतानाही पूर्वीप्रमाणेच स्नेह आहे...जवळीकता आहे...!
सातारा जिल्ह्यात काहीच अस्तित्व नसताना...शिवसेना सोडून तत्कालीन नेते नरेंद्र पाटील यांच्यासोबत घाटकोपर येथे झालेल्या राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात दिवंगत गोपीनाथ मुद्दे यांच्या हस्ते भाजपा प्रवेश केला होता...त्याकाळी त्यांच्यासोबत काढलेला फोटो म्हणजे आम्हाला खूप अभिमान वाटत होता...
पुढे अजून लिहणार आहे...!

पर्यावरण रक्षण-विचारकट्टा

विचारकट्टा नावाच्या आमच्या व्हाट्सअप ग्रुपवर वृक्षरोपण करायचे याबाबत चर्चा सुरु होती...या चर्चेतून मनात विचार सुरु झाले...दुष्काळी भागात राहणारे आमचे मित्र राहुल खराडे आणि विकास शिंदे-सरकार यांच्यासोबत बोलताना सहज लक्षात आले...!
लाखो झाडे लावली...पण आमच्या इकडच्या कुसळाशिवाय कोणत्याच झाडांची वाढ झाली नाही...कित्येक खादीवाले टगे झाले.. पण आमच्या इकडं काही बदल होईना...इंग्रजांनी बांधलेले तलाव आजवर टिकून आहेत पण आपलं तलाव एका पावसातच गायब हुत्यात...रस्त्याच्या कडला तवा लावलेली वडाची चिंचेची झाडे आजपण टिकली पण मागच्या 40 वर्षात सरकारने लावलेलं एक्कबी झाड रस्त्याकडला दिसत नाही...!
सध्या जलयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली सरकारी पैशातून..गावोगावी नदी,ओढे,ओघळी आणि नाले यांच्या खोलीकरण आणि पुरुज्जीवनाच्या नावाखाली मूळ प्रवाहाचे जेसीबी लावून रुंदीकरण करत सुपीक माती टग्यांनी पळवली आहे आणि प्रवशेजारी असणाऱ्या "पोटखराब" जागा संपवून झाडे झुडपे तोडली आहेत...!
अनेक ठिकाणी प्रवाहांच्या दिशा सोईस्करपणे बदलल्या आहेत...छोटे प्रवाह कायमचे बंद केले आहेत...प्रवाहाच्या बाजूने पाणी टिकवून ठेवणारे स्थानिक गवत,मोळ स्थानिक वनस्पती उखडून टाकल्या आहेत...मला नावे सांगता येत नाही पण केसांप्रमाणे आपल्या मुळ्या पाण्यात सोडून पाणी शोषणारी झाडे मी सहज ओळखू शकतो...मोठमोठाली काटेरी आणि बिगर काटेरी बांबूची बेटं बोटावर मोजण्याइतकी शिल्लक राहिली आहेत..!
आपली पूर्ण क्षमता वापरून खोलवर बिळे तयार करून पाणी मुरवण्यास मदत करणारे विविध खेकडे त्यामुळे नामशेष होत आहेत...गावच्या ओढ्यात आढळणारे झिंगे,लहान मासे शोधूनही मिळत नाहीत...सोन्या बेडूक इरुळे दिसेनासे झाले आहेत...!
नैसर्गिक शुद्ध पाण्याचे बारमाही असणारे झरे केव्हाच लुप्त झाले आहेत पण त्या झऱ्यांचा आसपास असणाऱ्या परिसराचे निरक्षण केले असता सहज दिसून येईल...उंबर,वड पिपर्णी आणि पिंपळ अशा झाडांची अगोदर कत्तल झाल्यामुळे काही दिवसांत... आसपास आढळणारे झरे नंतर गायब झाले...!
शेंबारटी,गजगे, घाणेरी,करवंद आदी काटेरी झुडपे आपण अगोदर संपवली...त्यामुळे एकमेकांच्या ओढीत सहकार्याने वाढणारे समूह संपले...आपण झाडं लावतोय फुलझाडे लावतोय झाडांची संख्या वाढवतोय...बांध घालतोय...चर खणतोय पाणी अडवण्याचा प्रयत्न करतोय...!
आपणाला एकदा विचार करावाच लागेल...प्रवाहाच्या विरोधात जाऊन जैवविविधतेचे नैसर्गिक परिसंस्थेचा विध्वस करत चाललेले हे पर्यावरण रक्षण खरंच आपल्या उपयोगी आहे कि याचे महत्व इव्हेंट पुरतेच आहे...?
शिवराम ठवरे-21-06-2016
मुक्त पत्रकार-9175273528
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र.
Shivramthavare25@gmail.com

शाहू महाराज

शाहू महाराज जिवंत असताना अगदी तारुण्यात सनातनी भटाकडून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली....एका राजाला जर अशी वागणूक हे सनातनी भट केवळ "जातीच्या श्रेष्ठत्वामुळे" देत असतील तर सर्वसामान्य जनतेची जनतेची अवस्था काय असेल या प्रश्नाची उकल करण्यासाठी त्यांनी काय कार्य केले हे सर्वाना आज येणाऱ्या अनेक मेसेजच्या माध्यमातून समजतच आहे...!
ब्राह्मणेतर समाजच्या शिक्षण आणि स्वाभिमानासाठी अखंड कार्य करणाऱ्या राजाला येथील प्रस्थापित व्यवस्थेने जाणून बुजून दुर्लक्षित केले कमीपणा दाखवला...काही खोट्या आणि बदनामीकारक कहाण्यादेखील पसरवल्या...!
आज मात्र अभिमान वाटावा असे चित्र आहे..सगळा सोशल मीडिया शाहूमय झाला आहे...आपल्या विचारांचा हा विजयच आहे...शाहूंचे कार्य समाजासमोर आणणाऱ्या ज्ञात अज्ञात पुरोगामी प्रगतशील कार्यकर्त्याना विद्रोही सलाम...!
शिवराम ठवरे-26-06-2016
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र.
Shivramthavare25@gmail.com

जाहीर आवाहन

जाहीर आवाहन,
साताऱ्याचे भारतीय भटके-विमुक्त विकास व संशोधन संस्थेचे "MSW आणि BSW" पदवीकरीता यशवंतराव चव्हाण स्कुल ऑफ सोशल वर्क,जकातवाडी,सातारा हे महाविद्यालय उत्तमच आहे..!
काही लोक माझ्या नावाचा वापर करून हे महाविद्यालय चांगले नाही...यामध्ये खूप अनागोंदी कारभार आहे... व्यवस्थापनची दडपशाही आहे असे स्वतःचे मत सांगत सुटले आहेत ...मी माघारी टिका करणारा नाही त्यामुळे यावर विश्वास ठेऊच नये....!
खरं तर हे मागेच सांगायला हवे होते...मागील काही वर्षांत मागासवर्गीय मुलांच्या फीबाबत आणि इ. बी. सी. सवलत आणि इतर कारणास्तव मी स्वतः महाविद्यालय प्रशासन आणि व्यवस्थापन यांचेकडे अर्ज विनंत्या केल्या होत्या...सोशल मीडियावर काही पोस्ट केल्या आहेत...काही वृत्तपत्रातही बातम्या होत्या...त्यातून आता बरेच सकारात्मक बदल झाले आहेत होत आहेत...सध्या महाविद्यालयात कोणत्याही मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फी आकारली जात नाही...शासकीय नियमाप्रमाणे सवलती लागू आहेत...EBC चा प्रश्न महाविद्यालयात पेंडिंग नसून शिवाजी युनिव्हर्सिटी आणि समाजकल्याण विभाग यांचेकडे प्रलंबित आहे...!
महाविद्यालयाचे प्रशासन चालवणाऱ्या "व्यक्तींशी मतभेद नसून त्यांचे काही कामाबाबत वैचारिक मतभेद" आहेत...त्यांचात आणि माझ्यात कोणतेही व्यक्तिगत वितुष्ट नाही...!
माझ्या स्वतःच्या जीवनात आमूलाग्र बदल होण्यासाठी या कॉलेजमधील 2 वर्षातील शिक्षणाचा 100% परिणाम झाला आहे... मला उत्तम नोकरीदेखील या महाविद्यालयातील शिक्षणामुळेच मिळाली आहे...!
आपल्यासारख्या गरीब आणि बहुजन समजातील मुलांचे भविष्य घडवण्यासाठी हे महविद्यालय अतिशय उत्तम असून... "महविद्यालय बदनाम करणाऱ्या कोणत्याही अफवा मी पसरवत नाही" याची नोंद घ्यावी...!
माझ्या परखड बोलण्याचा स्वभावाला या महाविद्यालयात कधीच अटकाव नव्हता आणि नाहीच... "इतक्या स्वतंत्र विचारांची शिक्षणसंस्था महराष्ट्रात शोधून सापडणार नाही"...मागे एका कार्यक्रमात काही प्रमाणात व्यक्तिगत टीका झाल्यामुळे काही माजी विद्यार्थी आणी माझे मतभेद झाले होते परंतु आता ते राहिले नाहीत...!
"समाजकार्य पदवीधरांची असोसिएशन" तयार करण्याचे काम महविद्यालयाला त्रास देणे नसून सहकार्याचेच आहे...याबाबत अनेक आजी माजी विद्यार्थ्यांना मी माझी भूमिका सांगितलेली आहेच...!
महाविद्यालय,समाजकार्य प्रोफेशन,ऍडमिशन अथवा पेलसमेंट आदी कोणत्याही बाबतीत कुणाला शंका अथवा अडचण असल्यास अवश्य संपर्क करावा....परंतु "यापुढे अशा अफवा टाळण्यासाठी सोशल मीडियावर महाविद्यालच्या संदर्भात टिपणी करणार नाही असे ठरवले आहे"..!
"पुरोगामी विचारांचा बालेकिल्ला असणारे हे महाविद्यालय वाढावे आणि टिकावे याकरिता आयुष्यात शक्य ते प्रयत्न करेन"...कोणत्याही गैरसमजबाबत थेट माझ्याशी संपर्क साधावा...!
आपला विश्वासू,
शिवराम ठवरे-9175273528
माजी विद्यार्थी-यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क जकतवाडी,सातारा.
Shivramthavare25@gmail.com

शेतकरी ते ग्राहक भाजीपाला

कृषीमाल नाशवंत आहे शेतकरी ते ग्राहक अशी संकल्पना कितीही छान वाटत असली तरी वास्तवात 10 ला पावशेर असे सांगितले तर 15 चं अर्धाकिलो देणार का...जरा शिळीच दिसतेय... असे काही बाही म्हणत चिवडून मला घेणारी मानसिकता कोण बदलणार...?
बरं शेतकरी काय एक आन अर्धा गुंठा भाजीपाला लावत नसतो...एखादी पाटी काढली कि फिरून यावा.... विक्रीतच दिवस गेला तर रोजचं काम कोण करणार...?
अच्छे दिनाचे हेदेखील स्वप्न भ्रामक असून सहकार क्षेत्र मोडीत काढून...सामान्य व्यापारी वर्गालादेखील झोपवून शेतीमध्ये भांडवलशाही तयार करण्याचं हे मोठं कारस्थान आहे...!
भाजीपाला पिकवयला कधीच रानात न जाणारा... आणि भाजीपाला आणायला कधीच मंडईत न गेलेला आजचा सोशल मीडियावर जागृत असणारा समाज यातील वास्तव न समजून घेता या सरकारी दाव्याचे पोकळ समर्थन करीत आहे हि त्यापेक्षा जास्त खेदाची बाब आहे...!
शिवराम ठवरे 01-07-2016
मुक्त पत्रकार-9175273528
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र
Shivramthavare25@gmail.com

डॉक्टर डे...!

आज डॉक्टर डे...!
गरिबांसाठी अपवाद वगळता डॉक्टरीसेवा म्हणजे भयावह अनुभव असतो...आजारपणाहून 10 पट भीती आता पैसा कुठून आणायचा याचीच असते...!
सरकारी दवाखाने केवळ तिथं नोकरी करणाऱ्या लोकांच्या उदरभरणाची केंद्रं झाली आहेत...तर धर्मादाय हॉस्पिटल योजना आणि पूर्वीची राजीव गांधी जीवनदायिनी आताची महात्मा फुले आरोग्य अभियान हे तर प्रचंड भ्रष्टाचाराची कुरणं झाली आहेत..!
कुणाशी भांडायचं... वाद घालून नियमाप्रमाणे मोफत उपचार करायची मागणी करून त्याचा हातात आपला जीव सुरक्षित राहील कसे समजायचं... माझ्या स्वतःच्या आणि कुटुंबातील आयुष्यात गरिबीमुळं सरकारी दवाखान्यात उपचारासाठी जाण्याचा खुपदा अनुभव आला...काही अनुभव भयानक होतें... कदाचित याच अनुभवामुळे या व्यवस्थेचा खूप राग येत असावा....!
अनुभव एक-साताराच्या क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात अर्थात सिव्हिलमध्ये आईला अपेंडिक्स ऑपरेशनला ऍडमिट केलं होत.. आईजवळ मी भाऊ आणि बहीण होतो...रात्रीचे साधारण 8 वाजले असतील... "अपेंडिक्स फुटला असून ताबडतोब ऑपरेशन नाही केलं तर जीव जाईल काय करायचं सांगा" असं म्हणत दोन-तीन डॉक्टर येतात...मी लहानच होतो...भाऊ कळता होता...करा कि बोलला...त्यांनी भावाला एका डॉक्टरजवळ नेलं...त्यानं गंभीरपणे परिस्थिती समजावून सांगितली... निर्विकार चेहरा करून 7000 रुपयांची मागणी केली. भाऊ ठीक आहे बोलला....आम्ही परत दुसऱ्या मजल्यावर आलो....आईला खाली घेऊन जायचं होतं... लिफ्टजवळ आलो लिफ्ट बंद..पायऱ्यांवरून आम्हीच तिला उचलून खाली आणलं...आम्ही बाहेरच थांबलो....ऑपरेशन चालू असताना मधेच एकदा लाईट गेली...जनरेटर लावा..जनरेटर लावा जनरेटर लावा असा गलका सुरु झाला...10 मिनटे झाली जनरेटर काय सुरु होईना शेवटी लाईटच आली...सगळेजण साधारण 10-11 ला बाहेर आले असतील... *ऑपरेशन सक्सेस झाले असून सकाळी पैसे घेऊन या असे सांगितले...!*
आइसोबत बहीण होती...भाऊ आणि मी आम्ही दोघे बाहेर झोपलो... सकाळी उठून ठरवलं भाऊ काय हॉस्पिटलमध्ये येणार नाही... आठवडाभर कसे तरी काढू डिस्चारज मिळाला कि विषय संपला... तो डॉक्टर रोज सकाळी राऊंडला यायचा आईच्या खाटेजवळ यायचा पण तपासणी न करताच माझ्या बहिणीला भाऊ कधी येणार विचारून पुढे जायचा.. असाच आठवडा गेला आईची थोडी बरी झालेली तब्यत अजून खालवायला लागली...ओल्या कपड्याने आईचं अंग पुसत असताना बहिणीला आईच्या ऑपरेशनच्या टाक्यात पु झालेला दिसला...त्यात अजून टाकेपण तोडले न्हवते...काय करावे समजेना....!
नेहमीप्रमाण सकाळी तो डॉक्टर आला...बहिणीनं रडून सांगितलं..अहो पु झालाय बघा कि...तो निर्लज्जपणे बोलला भावाला घेऊन ये मग बघतो....ऑपरेशनचे 7000 रुपये अजून दिले नाहीत..!
भाऊ हॉस्पिटच्या बाहेर रोज डबा घेऊन यायचा... बहीण त्यादिवशी खूप रडली...कायपण करून पैसे आणायला पहिजे नायतर आय मेली तरी कोण बघणार नाय...आम्हाला काय करावे कळेना...आमच्या शेजारी बसलेली एक बाई सगळं ऐकत होती....तीन एक उपाय सांगितला... घाबरू नका मी सांगती तसं करा...!
बहीण उठली थेट रडत जिल्हा शल्य अधिकारी केबिन गाठली...विषय समजावून सांगितलं...ताबडतोब चक्रे फिरली...त्या डॉक्टरला बोलावलं तंबी दिली...त्यानं त्याच दिवशी टाके काढले ड्रेसिंग केले...तो दिवस आनंदात गेला..!
दुसऱ्या दिवशी परत तो आला ना पाहताच गेला...तिसऱ्या दिवशी तेच बहीण चिकाटीची होती आणि थोडी प्रसिद्धपण झाली होती.... नर्सिंग कर्मचारी युनियनच्या एका बाईनं हॉस्पिटलमध्ये उदयनराजे ऍडमिट आहेत त्यांना भेटा असे सांगितले...त्यावेळी ते अटकेत होते आणि वैद्यकीय कारणास्तव सिव्हिलमध्ये ऍडमिट होते....बहीण धिटाईने त्या बाईसोबत गेली..आता चक्र वेगानं फिरली..रोज रेग्युलर तपासणी...चांगली देखभाल आणि बिल माफी करून आईला डिस्चार्ज मिळाला...!
आम्ही आनंदात होतो...पण उपचार करायला काय काय करावे लागले...आणि झालेला मानसिक त्रास अजून डोळ्यासमोर येतो....संताप अनावर होतो...त्यानंतर बरेच वर्षांनी 2007 साली एक बातमी समजते... तो डॉक्टर जिल्हा शक्य अधिकारी म्हणून निवडला जातो....त्याचं नाव डॉ.सुरेश जगदाळे...काय करणार या व्यवस्थेला...?
यात दोन प्रसिद्ध व्यक्तींची नावं घेतली आहेत पण हि गोष्ट बनावट अथवा काल्पनिक खोटी नाही बरं... वास्तव आहे...आमच्या आयुष्यात काही वर्षांपूर्वी झालेली आहे... यातील सारी पात्रं अजूनही जिवंत आहेत...माझ्या अपरोक्ष कुणाशीही बोलता येऊ शकतं.. अजूनही आमच्या घरात हा विषय कधीतरी निघतो...!
आज डॉक्टर डे म्हणून आठवलं..सगळेच डॉक्टर तसे असतात असेही नाही...आणि सावजिनक आरोग्य संस्था अगदीच टाकाऊ आहेत असेही नाही...सार्वजनिक आरोग्य संस्था टिकाव्यात वाढाव्यात याच मताचा मी आहे...परंतु असे अनुभव येतात हेदेखील वास्तव आहे...असे अनेक अनुभव आहेत...एका दमात लिहून काढणं शक्य नाही...!
शिवराम ठवरे-9175273528
मुक्त पत्रकार-01-07-2016
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र.
Shivramthavare25@gmail.com

हम होंगे कामयाब...!!

हम होंगे कामयाब...!! हम होंगे कामयाब...!!
होगी शांती चारो ओर...!होगी शांती चारो ओर..!!
मन है विश्वास,पुरा है विश्वास..हम होंगे कामयाब...एक दिन..!!!
इस्लामका नाम लेकर किये जानेवाले आतंकवादी हमले विश्वशांती के लिये जरूर खतरनाक है....खुदको धर्म के ठेकेदार समझनेवाले इस्लाम के मूल्य नकारकर कुराण का अपनी सोच के हिसाब से अर्थ निकालकर युवावर्ग को जिहाद का नाम देकर संहारक बनाते है...!
दहशतवादी कितना शिक्षित है उससे क्या फरक पडता है...शिक्षा कि व्यवस्थामें मानवी मूल्य वा प्रेमभावके अलावा सबकुछ सिखाया जा रहा है...शिक्षणसंस्था भांडवली वर्गोके गुलाम पैदा करने के मशीन हो चुके है...जिसका मन मर चुका है..एकेलेपण का शिकार होकर या तो नशा करता है या इन धर्म के ठेकेदारोका शिकार होता है...!
बल्की बहुतांश लोक इन सबसे खुदको अलग रखकर अपनी जिंदगी संवारते है...धर्म को जीवन में सिमित रखकर विश्व कि प्रगती अमन के हिस्से बनते है...!
ये केवल इस्लाममें है ऐसा नही... आतंकवादको कोई धर्म नही है...वो मेरे इधर भी है...सनातनी विचारधारा का नाम लेकर अनपनेही लोगोंका खून निचोड रहा है...बम फोड रहा है...समाजमें अशांती का माहौल बना रहा है...ये कायर तो उनसेभी जादा खतरनाक है...!
मानवता का स्वीकार करनेवाले हम सभीकों विश्वशांती के लिये आपसी संयोग और सहयोग बढाना है...इस्लामको टार्गेट करते हुये अपनी अविश्वास कि दरार बढाकर अलगवाद को पोसना नही है...!
हम अमनके रखवाले है...इधर भी है उधर भी है...पुरे विश्वमें है...हम सब एक होकर एकदीन कामयाब होकर दिखायेंगे...!
शिवराम ठवरे-05-07-2016
मुक्त पत्रकार-9175273528
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र
Shivramthavare25@gmail.com

आम्ही मात्र मनातल्या मनात हसत असतो...!

आम्ही मात्र मनातल्या मनात हसत असतो...!
आज जेव्हा हि लोकं नागराजला जवळ करत "शेल्फी" वगैरे काढतात....सत्कार करतात...आणि सोबत एखादा कार्यक्रम करायला मिळवा म्हून धडपडतात...!
आम्ही मात्र मनातल्या मनात हसत असतो...!
आज जेव्हा त्या लोकांना त्याची मांडणी छान वाटू  लागते...डोक्याला "शॉट" देत विचार करायला लावते...अचानक हे सारे "वास्तववादी" आहे असे म्हणायला लावते...!
आम्ही मात्र मनातल्या मनात हसत असतो...!
आज जेव्हा ती माणसं तो "वडार" आहे असे सांगतात...त्याच्या चित्रपटातील नायिका "दलित" आहे सांगतात....आणि खलनायक मराठा पाटील जाणून बुजून दाखवला आहे असे सांगतात...!
आम्ही मात्र मनातल्या मनात हसत असतो...!
आज जेव्हा ती लोक आपल्या मुलीला मित्रासोबत बोलायला नकार देतात...आपल्या बहिणीला प्रेम म्हणजे कुणाच्या नादाला लागलीसे तर बघ असा "हग्या दम" देतात..आणि केलेच तर "विषय" संपवतात....!
आम्ही मात्र मनातल्या मनात हसत असतो...!
आज जेव्हा ती लोकं आपल्या मुलीचे,बहिणीचे "स्वजातीय" मुलाशी "थाटात लग्न" लाऊन देतात...तिच्या वरातीत "झिंगाट" होऊन नाचतात...पण "हक्कसोडपत्रावर" सही नाही केली तर जिवंतपणानीच "श्रद्धांजली" वाहतात...!
आम्ही मात्र मनातल्या मनात हसत असतो...!
आज जेव्हा त्याला "कोट्यवधी" रुपये मिळाले अशा बातम्या येतात...तो विमानात फिरायला जातोय म्हणतात...आणि "दुष्काळग्रस्तांना" तो त्यातले काहीच का देत नाही असेही ते बोलतात...!
आम्ही मात्र मनातल्या मनात हसत असतो...!
तो कित्येक वेळा जवळ असतो...सोबत असतो गप्पा मारतो...जीवनाच्या चित्रपटातील "वास्तववादी स्टोऱ्या" सांगतो...आणि तो आमच्यावर आणि स्वतःवरही ओरडतो...!
आम्ही मात्र मनातल्या मनात हसत असतो...!
आज तो सोबत असताना एक पोटो सुद्धा सोबत काढला नाहीस असे मित्र विचरातात....मी त्यांना मनातल्या मनात हसत बोललो...त्याचा सोबत पोटो अवघड नाही गड्या पण तो "डोक्यातच फिट" बसलाय...आणि तो "बाहीरच ईना" झालाय...!
आम्ही मात्र मनातल्या मनात हसत असतो...!
शिवराम ठवरे 11-05-2016
मुक्त पत्रकार 9175273528
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र.
Shivramthavare25@gmail. com