Saturday 5 March 2016

कन्हैय्या कुमारचे भाषण

मी एका गावातून आलेला सामान्य विद्यार्थी आहे. तिथे अनेकदा जादूचे खेळ होतात. हे जादूगार लोकांना अंगठ्या विकतात आणि त्यांची इच्छा पूर्ण होईल, असे सांगतात... असेच काही लोक आपल्या देशातही आहेत. ते आम्ही काळा पैसा परत आणू, सबका साथ सबका विकास, अशा बतावण्या मारतात. आपण भारतीय लोक अशा बतावण्या विसरूनही जातो. पण यावेळचा हा तमाशा मोठा आहे आणि तो विसरण्यासारखा नाही,' अशा शब्दांत जेएनयू विद्यार्थी नेता कन्हैया कुमारने तुरुंगाततून सुटल्यानंतर मोदी सरकारवर खरमरीत टीका केली. कन्हैयाने आपल्या ४० मिनिटांच्या भाषणात आरएसएस, भाजप, अभाविप यांच्यावरही निशाणा साधला.

कन्हैय्या कुमारला हंगामी जामीन मंजूर झाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी अपेक्षेप्रमाणे त्याची तिहार तुरुंगातून सुटका झाली. विद्यापीठामध्ये देशविरोधी घोषणा दिल्यानंतर त्याच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे. कन्हैय्याला खासगी वाहनातून हरीनगर पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले. त्यानंतर त्याचे जेएनयूमध्ये आगमन होताच विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी त्याने उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित केले.

'आम्हाला भारतापासून स्वातंत्र्य नको. आम्हाला भारतामध्ये स्वातंत्र्याचे वातावरण हवे आहे,' असे कन्हैय्या म्हणाला. भूक, भ्रष्टाचार, भेदभाव आणि मागासलेपणापासून ही मुक्ती.... अशा घोषणा देतच त्याने भाषणाची सुरुवात केली. कन्हैय्याने केलेल्या भाषणाला राजकीय किनारही होती. आपल्या भाषणामध्ये त्याने सरकारवर निशाणा साधला. सरकारच्या विद्यापीठामधील कारवाईबाबत तो म्हणाला, ''जेएनयू'वरील सरकारची कारवाई नियोजित होती. त्यांना विरोधाला बेकायदा ठरवायचे होते. रोहित वेमुलाला न्याय मिळावा, यासाठी चाललेल्या लढाईतील धार त्यांना कमी करायची होती. ही लढाई यापुढेही सुरू राहील. लोकशाहीचे पुरस्कर्ते असल्यामुळे अभाविप या संघटनेविरोधात कटुतेची भावना नाही.'

हिटलरचीही गोष्ट सांगा...

पंतप्रधान मोदी यांनी आज संसदेत केलेल्या भाषणात स्टॅलिनची गोष्ट सांगितली होती. तो धागा पकडून कन्हैया म्हणाला, 'पंतप्रधान जेव्हा स्टलिनची गोष्ट सांगत होते तेव्हा वाटलं टीव्हीत शिरावं आणि मोदींचा सूट पकडून सांगाव... जरा हिटलरविषयीही बोला. हिटलर नाही तर मुसोलिनीबाबत तरी बोला. ज्या मुसोलिनीला आपले गोळवलकर गुरुजी भेटले होते. ज्याच्यासारखी काळी टोपी आपण घालता. त्याविषयी बोला.'

काय म्हणाला कन्हैया?

पंतप्रधान मोदी 'सत्यमेव जयते' असं ट्विट करतात पण 'सत्यमेव जयते' हे कोणा एका व्यक्तीचे होऊ शकत नाही. भारतीय राज्यघटनेचं ते देणं आहे. त्यामुळे आम्हीही 'सत्यमेव जयते' म्हणणार आहोत.

माझी स्वत:ची एक विचारसरणी आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी माझा संबध नाही. मात्र माझं समर्थन करणाऱ्या राहुल गांधी, सीताराम येचुरी, अरविंद केजरीवाल या नेत्यांवरही देशद्रोहाचे आरोप लावण्यात आले. देशात एकप्रकारची भयंकर अशी प्रवृत्ती बळावताना दिसत आहे. त्यापासून आपणाला सगळ्यांनाच सावध व्हावं लागणार आहे.

'जेएनयू'तून जो आवाज उठला त्याचा विरोध कसा करायचा, याची संपूर्ण योजना नागपुरातून आखण्यात आली. या सगळ्यामागे आरएसएस आहे.

'जेएनयू' विरोधातील हा हल्ला पुर्वनियोजित होता. अशा हल्ल्यांनी आम्ही दबणार नाही. तुम्ही जेवढं आम्हाला चिरडण्याचा प्रयत्न कराल तेवढेच भक्कमपणे आम्ही उभे राहू. अत्याचाराविरोधात 'जेएनयू'ने नेहमीच आवाज उठवला आहे आणि यापुढे हा आवाज असाच बुलंद राहणार आहे.

अयोध्येचा मुद्दा पुन्हा रेटला जात आहे पण यावेळी 'मुंह मे राम और बगल मे छुरी' खपवून घेतली जाणार नाही.

पंतप्रधान 'मन की बात' करतात पण 'मन की बात' ऐकत मात्र नाहीत. पंतप्रधानांनी लोकांचं म्हणणं ऐकलं पाहिजे, एका माऊलीच्या मनात काय चाललंय हे जाणून घेणारा पंतप्रधान हवा आहे.

मी माझी कहाणी स्वत:च लिहिणार आहे. त्याची सुरुवात मी जेलमधून केली आहे. मी कधीही भारताविरोधात बोललेलो नाही. सत्य हे शेवटपर्यंत सत्यच राहतं, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. हळहळू सगळ्या गोष्टी पुढे येणार आहेत. मी दीर्घ लढाईसाठी सज्ज आहे.

'अभाविप'बाबत आमच्या मनात कोणताही द्वेष नाही. आम्ही त्यांना शत्रू नाही तर विरोधक मानतो.

तिरंगा फडकला, 'जय हिंद'च्या घोषणा घुमल्या

देश विरोधी घोषणांमुळे कन्हैयावर कारवाई झाली असताना आज मात्र कन्हैयाचं भाषण सुरू असताना तिरंगा डौलाने फडकताना दिसत होता. यावेळी 'जय हिंद', 'भारत माता की जय' अशा घोषणाही देण्यात आल्या. यावेळी 'आझादी'च्या घोषणांनी सारा परिसर दणादणून गेला होता. 'हम चाहते है आझादी', 'भुखमरी से आझादी', 'संघवाद से आझादी', 'मनुवाद से आझादी', 'दंगाइयों से आझादी', 'सामंतवाद से आझादी, 'जातिवाद से आझादी', 'हम लेकर रहेंगे आज़ादी' अशा घोषणा कन्हैयासोबत विद्यार्थ्यांनी दिल्या.

पुरावा नसल्याचा दावा

येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी कन्हैया कुमार आणि उमर खालिद यांनी देशाच्या विरोधात घोषणाबाजी केल्याचा पुरावा नसल्याचे दिल्ली सरकारच्या चौकशीत उघड झाले आहे. दोघांवरही देशद्रोहाचा आरोप आहे. संसदेवरील हल्ला प्रकरणातील आरोपी अफजल गुरूच्या फाशीला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ९ फेब्रुवारीला झालेल्या कार्यक्रमात दोघांनीही देशविरोधात घोषणा दिल्याचा आरोप आहे. मात्र, या संदर्भात कोणीही साक्षीदार उपलब्ध नसल्याचे दिल्ली सरकारच्या अहवालात म्हटले आहे. 'काश्मिरीज कीप फायटिंग, वी आर विथ यू' असे खालिद म्हणत असल्याचे व्हिडिओत ऐकू येते, असे अहवालात म्हटले आहे.

#कन्हैय्या कुमारचे भाषण

No comments:

Post a Comment