Friday 8 July 2016

पर्यावरण रक्षण-विचारकट्टा

विचारकट्टा नावाच्या आमच्या व्हाट्सअप ग्रुपवर वृक्षरोपण करायचे याबाबत चर्चा सुरु होती...या चर्चेतून मनात विचार सुरु झाले...दुष्काळी भागात राहणारे आमचे मित्र राहुल खराडे आणि विकास शिंदे-सरकार यांच्यासोबत बोलताना सहज लक्षात आले...!
लाखो झाडे लावली...पण आमच्या इकडच्या कुसळाशिवाय कोणत्याच झाडांची वाढ झाली नाही...कित्येक खादीवाले टगे झाले.. पण आमच्या इकडं काही बदल होईना...इंग्रजांनी बांधलेले तलाव आजवर टिकून आहेत पण आपलं तलाव एका पावसातच गायब हुत्यात...रस्त्याच्या कडला तवा लावलेली वडाची चिंचेची झाडे आजपण टिकली पण मागच्या 40 वर्षात सरकारने लावलेलं एक्कबी झाड रस्त्याकडला दिसत नाही...!
सध्या जलयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली सरकारी पैशातून..गावोगावी नदी,ओढे,ओघळी आणि नाले यांच्या खोलीकरण आणि पुरुज्जीवनाच्या नावाखाली मूळ प्रवाहाचे जेसीबी लावून रुंदीकरण करत सुपीक माती टग्यांनी पळवली आहे आणि प्रवशेजारी असणाऱ्या "पोटखराब" जागा संपवून झाडे झुडपे तोडली आहेत...!
अनेक ठिकाणी प्रवाहांच्या दिशा सोईस्करपणे बदलल्या आहेत...छोटे प्रवाह कायमचे बंद केले आहेत...प्रवाहाच्या बाजूने पाणी टिकवून ठेवणारे स्थानिक गवत,मोळ स्थानिक वनस्पती उखडून टाकल्या आहेत...मला नावे सांगता येत नाही पण केसांप्रमाणे आपल्या मुळ्या पाण्यात सोडून पाणी शोषणारी झाडे मी सहज ओळखू शकतो...मोठमोठाली काटेरी आणि बिगर काटेरी बांबूची बेटं बोटावर मोजण्याइतकी शिल्लक राहिली आहेत..!
आपली पूर्ण क्षमता वापरून खोलवर बिळे तयार करून पाणी मुरवण्यास मदत करणारे विविध खेकडे त्यामुळे नामशेष होत आहेत...गावच्या ओढ्यात आढळणारे झिंगे,लहान मासे शोधूनही मिळत नाहीत...सोन्या बेडूक इरुळे दिसेनासे झाले आहेत...!
नैसर्गिक शुद्ध पाण्याचे बारमाही असणारे झरे केव्हाच लुप्त झाले आहेत पण त्या झऱ्यांचा आसपास असणाऱ्या परिसराचे निरक्षण केले असता सहज दिसून येईल...उंबर,वड पिपर्णी आणि पिंपळ अशा झाडांची अगोदर कत्तल झाल्यामुळे काही दिवसांत... आसपास आढळणारे झरे नंतर गायब झाले...!
शेंबारटी,गजगे, घाणेरी,करवंद आदी काटेरी झुडपे आपण अगोदर संपवली...त्यामुळे एकमेकांच्या ओढीत सहकार्याने वाढणारे समूह संपले...आपण झाडं लावतोय फुलझाडे लावतोय झाडांची संख्या वाढवतोय...बांध घालतोय...चर खणतोय पाणी अडवण्याचा प्रयत्न करतोय...!
आपणाला एकदा विचार करावाच लागेल...प्रवाहाच्या विरोधात जाऊन जैवविविधतेचे नैसर्गिक परिसंस्थेचा विध्वस करत चाललेले हे पर्यावरण रक्षण खरंच आपल्या उपयोगी आहे कि याचे महत्व इव्हेंट पुरतेच आहे...?
शिवराम ठवरे-21-06-2016
मुक्त पत्रकार-9175273528
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र.
Shivramthavare25@gmail.com

No comments:

Post a Comment