Thursday 7 April 2016

नाना पाटेकर सामजिक क्रांतीकारक कि मारक....?

नाना पाटेकरसारखे नाही आपण "क्रांतीवीर" बनूयात...!

एका "मोठ्या अभिनेत्याचे" नाव घेऊन सारखे मेसेज येत आहेत....कोणत्याही शेतकऱ्याला पैशावाचून आत्महत्या करायला वेळ आली तर अमुक नंबरवर फोन करा...तुमच्या मुलीचे बहिणीचे लग्न करायला पैसे नसतील एक रिंग करा...मंगळसूत्र, भांडी, संसार उपयोगी सामान आदी सुमारे 1 लाखाचा खर्च आम्ही करू......!

तो अभिनेता देखील नडलेल्या शेतकरी बांधवाना "रोख रक्कम" देत असल्याच्या बातम्या आहेत...त्यामुळे लोकांना खरं वाटतय... लोकं विचार करतात आपण काही देत नाही किमान हा मेसेज तरी पुढे पाठवूया.....!

सगळी लोकं वाचतात पुढे पाठवतात....कुणी चर्चा करतात...कुणाची नैसर्गिक मदत भावना जागी होते "नाम फाउंडेशनला" मदत करायचे ठरवतात...कुणी हजार कुणी पाचशे...कुणी नेता 10 हजार कुणी व्यापारी 20 हजार...कुणी देवस्थान 1 लाख कुणी मोठे देवस्थान 5 लाख  दररोज पैशाचं भरभरून दान...!

याच पैशे वाटपाचे तिकडे जोरदार चित्रण सुरु होते दुष्काळी भागात मोठाले स्टेज... मोठमोठी भाषणे...रडण्याचे चित्रीकरण पुन्हा क्लिपिंग पुन्हा पीपीटी पुन्हा भावनिक बाजार...!

वर्षानुवर्षे तेच तेच सोंग...कधी नाना कधी कोण...शेतकरी भिकारीच....शेतकरी मृत्यूची खरी कारणे शोधावी लागतील...पैसे नाहीत हे बरोबरच आहे पण...!

एकाही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याने "मला काम मिळावे" म्हणून अर्ज केलेला नाही हे वास्तव विसरू नका...महात्मा गांधी रोजगार हमी योजना आहे...जर सरकार त्याला काम मागून देऊ शकले नाही तर  काम मिळाले म्हणून न केलेल्या कामाचा 100% मोबदला मिळतो....!

शेतकरी शेतमजुरांच्या मुलींच्या लग्नात खर्च करूच नये...एका बाजूला "चांगल्या मुलांना शोधून मुली मिळत नाहीत"अशी अवस्था आहे तर हुंडा मागणारा धुमधडाक्यात लग्न करावे अशी अपेक्षा करणारा जावई नकोच असला नवरा नकोच अशी भूमिका घेतली पाहिजे....!

ज्याला करायचे आहे त्याने माझ्याशी किंवा माझ्या मुलीशी रजिस्टर लग्न करावे आणि संसार सुरु करावा अशी भूमिका घ्यावी म्हणून का कोणी मागणी करत नाही...सरकार अशी लग्ने करणारा लोकांनाही रोख 10 हजार अनुदान देते....उगाच अशा संस्थाना का त्रास.... कशाला याचना करायची...तेच सरकारी अनुदान 1 लाख करा अशी मागणी करूयात...सरकारचे कामच आहे ते त्यांना जाब विचारुयात....!

कुठवर त्या टॅक्स बुडवणाऱ्या.....व्हॅट नको म्हणणाऱ्या व्यापारी वर्गाचे पैसे घेणार....कुठवर त्या दानपेटीत टाकलेल्या बेहिशेबी पैशावर आशा धरणार...!

नेतेही गंमतीदार ज्यासाठी निवड झाली ते काम करत नाहीत पण नामच्या स्टेजवर येऊन चार दोन लाख जाहीर करतात...आणि लोकांच्या टाळ्या मिळवतात...!

आपली लोकही मग "नानाला दैवी अवतार" बनवतात....माणूस म्हणजे एकच नानाच बाकी सगळे भुक्कड...कुणी आरतीही बनवतील कदाचित मराठवाड्यात एखादे नानांचे देऊळ बांधतील...!

आणि हे वाचत असताना काहीजण मला शिव्या घालतील हा काय करतोय रे...स्वतः काही करायचे नाही आणि जे करतात त्यांच्या नावाने नुसते बोंबलत बसायचे...!

मलाही नाना आवडतो पण दान देणारा माणूस म्हणून नाही....मुजोर व्यवस्थेविरोधात दोन हात कारयला सांगणारा... लाचार बनून मदतीची याचना न मागता स्वतः हातपाय हालवायला सांगणारा....भ्रष्ट लोकांवर प्रहार करायला सांगणारा यशवंत "क्रांतीवीर" नाना पाटेकर.....!

बुळचटपणे फेसबुकवर व्हाट्सऍपवर कमेंट करणे सोपे आहे....कधी स्वतःच्या गावात चालणाऱ्या लबाडीबाबत बोला... सरकारी योजनाचा लाभ मिळत नाही त्याच्याविरुद्ध आवाज उठवा...कधी सामूहिकपणे सरकारच्या भांडवलदारी धोरणा विरोधात चार माणसे एकत्र करा...!

कधी हुंडा मागणाऱ्या एखाद्या मुलास जाब विचारा... कधीतरी तुमचा मोबाईल घेऊन सरकारी कार्यालयांत चक्कर मारा दिसले काही चुकीचे तर नक्की सोशल मीडियावर टाका... कधीतरी या "देशातील समस्या मुळातून संपाव्यात" म्हणून विचार करा...!

कधितरी "आम्हाला मोफत शिक्षण मिळावे" हि मागणी करा...कधीतरी "कंत्राटी नोकरभरती संपावी" म्हणून काय करता येईल याचा विचार करा...कधीतरी नाना पाटेकरच्या फिल्म मधील क्रांतीवीराच्या भूमिकेत शिरायला पहा....!

कुणी म्हणेल तूला काय माहित दुष्काळात काय अवस्था होते....त्याला एकच उत्तर आहे 1972 च्या दुष्काळात केवळ 500 रुपयात 11 एकर जमीन गहाण ठेऊन (जी आजही परत माघारी मिळाली नाही) अंगावरील कपड्यावर साताऱ्याला पोट भरायला आलेल्या माझ्या आई बापाला भेटा...!

सहज आताच एक दोन आलेले मेसेज पाहून आठवले म्हणून लिहले बघा पटतंय का...बघा जमतय का...कुठवर आपण भावनिक होऊन एकतर "भीक मागणार किंवा भीक देणार" नाही का...?

शिवराम ठवरे 13-03-2016
मुक्त पत्रकार 9175273528
Shivramthavare25@gmail.com

No comments:

Post a Comment